मुंबई: राज्य सरकारने देशी आणि विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात भरघोस वाढ केल्याचा थेट परिणाम राज्याच्या मद्यविक्रीवर दिसून येत आहे. मद्य महाग झाल्याने राज्यातील मद्यविक्री कमी होईल, असा अंदाज होता. मात्र, कर वाढवल्यानंतरही राज्य सरकारची तिजोरी भरली आहे. महागड्या मद्य-बीअरसाठी नवा पर्यायाचा उतारा मिळाला आहे.
विदेशी मद्याच्या किमती वाढल्यामुळे मद्यप्रेमींनी आता आपला मोर्चा स्वस्त पर्याय असलेल्या महाराष्ट्र मद्य आणि बीअरकडे वळवला आहे. परिणामी, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात बीअरच्या खपाने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला असून, बीअर हे राज्याचे सर्वात लोकप्रिय पेय ठरले आहे.
विदेशी मद्य महागले, बीअरची चांदी
गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात देशी आणि भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याला मोठी मागणी होती. मात्र, जून महिन्यात उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्यावर तीन ते चारपट कर लागू केल्यामुळे हे मद्य सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे झाले. आकडेवारीनुसार, वर्ष २०२५ मध्ये ३२ कोटी लिटर खप असलेले विदेशी मद्य यंदा २७ कोटी लिटरवर घसरले आहे.
दुसरीकडे, बीअरचा खप मात्र ३८ कोटी लिटरवरून थेट ४६ कोटी लिटरवर पोहोचला आहे. साधारणपणे उन्हाळ्यात बीअरच्या मागणीत ६ टक्क्यांनी वाढ होते, मात्र यंदा गेल्या ११ महिन्यांपासून बीअरच्या विक्रीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र मद्य श्रेणीला मिळतोय प्रतिसाद
विदेशी मद्य महाग होत असतानाच सरकारने महाराष्ट्र बनावटीचे मद्य ही नवी श्रेणी बाजारात आणली. ऑक्टोबरपासून या नवीन प्रकारच्या मद्याचा सुमारे १ कोटी ८६ लाख लिटर इतका खप झाला आहे. या नव्या स्पर्धेमुळे देशी दारूच्या विक्रीवरही परिणाम झाला असून, गेल्या वर्षी ४० कोटी लिटर असलेली विक्री यंदा ४२ कोटी लिटरवरच स्थिरावली आहे. वाइनच्या खपात मात्र कोणताही लक्षणीय बदल झालेला नाही.
तिजोरी झाली मालामाल; महसुलात १८ टक्क्यांची वाढ
मद्याच्या किमती वाढल्या असल्या तरी राज्य सरकारच्या महसुलात मात्र मोठी भर पडली आहे. वर्ष २०२५ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाला २५,४६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. दरवर्षी या महसुलात साधारण ८ टक्के वाढ होते, मात्र यंदा ही वाढ थेट १८ टक्क्यांवर पोहोचली असून तिजोरीत २९,९५७ कोटी रुपये जमा झाले आहेत.
बीअर शॉपींच्या संख्येत वाढ
राज्यात सध्या ११ मोठ्या ब्रुअरी आणि ३७ लघु ब्रुअरी कार्यरत आहेत. वाईन शॉपचे नवीन परवाने बंद असले तरी, बीअर शॉपींचे परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे राज्यात बीअर शॉपींची संख्या आता ५,५८८ वर गेली आहे. सौम्य बीअरमध्ये ५ टक्के तर तीव्र बीअरमध्ये ८ टक्के अल्कोहोलचे प्रमाण असल्याने, मद्यप्रेमींचा बीअरकडे वाढणारा कल हा आरोग्याच्या दृष्टीने कमी घातक मानला जात आहे.